नाशिक : उषेत तेव्हा ताम्रनभातून सुवर्ण किरणावली..., शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली म्हणाली, गाणं गाऊ का...., साद घालशील तेव्हाच येईन, जितकं मागशील तितकच देईन..., दर्शनाला आलात? या.. पण या देवालयात सध्या देव नाही... अशा एकापेक्षा एक सरस कुसुमाग्रजांच्या अजरामर काव्यसंग्रहातील काव्यांच्या सुमधुर गायनाने ‘विशाखा’ न्हाऊन निघाले. निमित्त होते, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात मराठी भाषा गौरव दिन मंगळवारी (दि.२७) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात ‘सुवर्ण किरणावली’ या बहारदार काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘मारवा’ कवितेपासून मैफलीला प्रारंभ करण्यात आला. यानंतर ‘रंग’, ‘यौवन’, ‘गाभारा’, ‘ध्यास’, ‘ताराभेट’, ‘भुलावा’, ‘विजयासाठी’, ‘झड’, ‘जोगीण’, ‘सांज’, ‘वादळ’, ‘देणगी’, ‘जाता जाता’ अशा एकापेक्षा एक सरस कवितांचे सादरीकरण यावेळी सादर करण्यात आले. यानंतर मातीतील एक कहाणी... ही भैरवी सादर करण्यात आली. जाता जाता गाईल मी.. या कवितेने मैफलीचा समारोप करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या स्मृतींनी उजाळा देणाºया या मैफलीत त्यांच्या गाजलेल्या कवितांपैकी काही कविता सादर करण्यात आल्या. बहारदार काव्यमैफल उत्तरोत्तर रंगत गेली. कुसुमाग्रजांना त्यांच्या जयंतीनिमित्त काव्यरूपी अभिवादनाच्या या भावविष्काराने श्रोते तल्लीन झाले.या काव्यमैफलीत मकरंद हिंगणे, सुखदा दीक्षित, पूनम अमृतकर, मिलिंद धटिंगण यांनी गायन केले. कवी किशोर पाठक, श्रृतकीर्ती कर्वे यांनी अभिवाचन केले. अनिल दैठणकर यांनी व्हायोलिनद्वारे साथसंगत केली. ध्वनिसहाय्य पुष्कर जोशी यांनी केले व प्रकाशयोजना व नेपथ्य विनोद राठोड यांचे होते.
काव्यरूपी अभिवादन : कुसुमाग्रजांच्या कवितांच्या सुमधुर गायनात श्रोते तल्लीन ‘विशाखा’मध्ये सुवर्ण किरणावलीची बरसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:27 AM
नाशिक : उषेत तेव्हा ताम्रनभातून सुवर्ण किरणावली..., शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली म्हणाली, गाणं गाऊ का...., साद घालशील तेव्हाच येईन.
ठळक मुद्दे‘विशाखा’ न्हाऊन निघालेकवितेने मैफलीचा समारोप