नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्ज वसुली पथकासमोरच कर्जदार महिला शेतकºयाच्या मुलाने विषप्राशन केले. तर अन्य एका मुलाने जिल्हा बॅँकेच्या वसुली पथकाच्या वाहनाची काच फोडल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, कर्जदार महिला व तीच्या मुलास नाशिकरोड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्हा बॅँकेचे कर्ज वसुली पथक पांढुर्ली येथे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वाजे मळ्यात गेले होते. यावेळी कर्जदार कुटुंबिय व वसुली पथक यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्यानंतर कैलास मुकुंद वाजे (३२) याने वसुली पथकासमोरच विष प्राशन केल्याचे समजते. यावेळी त्याची आई सुलोचना मुकुंद वाजे यांच्याही अंगावर व तोंडात विष गेल्याचे कळते. या दोघांनाही त्यामुळे विषबाधा झाली. दोघांना नाशिकरोड येथील संतकृपा रुग्णालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. पांढुर्ली येथील सुलोचना मुकुंद वाजे यांनी विकास संस्थेकडून २००६ साली कर्ज घेतले आहे. या कर्ज वसुलीसाठी जिल्हा बॅँकेचे कर्ज वसुली पथक इनोव्हा कार (क्र. एम. एच. १७ व्ही. ९६९५) घेवून गेले होते. यावेळी उभयतांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याचे समजते. कैलास वाजे यांनी पथकासमोारच विष घेतले व आई सुलोचना यांच्याही तोंडात विष गेल्याचे कळते. यावेळी कैलास यांच्या लहान भावाने वसुली पथकाच्या वाहनावर दगड फेकल्याने काच फुटली. याप्रकरणी जिल्हा वसुली पथकातील अधिकाºयाने वाहनाचे नुकसान झाल्याची फिर्याद सिन्नर पोलीस ठाण्यात दिली.
वसुली पथकासमोर शेतकऱ्यांचे विषप्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 1:04 AM