अझहर शेख नाशिकशहरातील विविध भागांमध्ये भर रस्त्यात उंच वाढलेले वृक्ष वाळून गेल्याचे चित्र पदोपदी पहावयास मिळते. काही ठरावीक वयोमर्यादेनंतर तसेच खोडकीड, वाळवी लागल्यामुळेही वृक्ष वाळतात; मात्र याच कारणांचा ‘आधार’ घेत रसायनाचे ‘डोस’ डौलदार झाडांना देऊन हिरव्या झाडांची वाढ संपुष्टात आणण्याचे प्रकार शहर व परिसरात सर्रास सुरू असल्याचे बोलले जात आहे.खोडकीड, वाळवी, उदयी मातीसारखी दिसणारी कृमीची बुरशी (नेमाटोड) लागल्यामुळे झाडाचा जीव धोक्यात येतो आणि बहरलेली झाडेदेखील वाळतात; मात्र गंगापूररोड, गंगापूर, तपोवन, आनंदवली, मखमलाबाद, देवळाली कॅम्प, टाकळी, विल्होळी, अंबड आदि परिसरात असलेल्या वृक्षसंपेदमध्ये बहुसंख्य वृक्षांवर वाळवी व खोडकीडीचा प्रादुर्भाव झाला नसला तरी ती वाळलेली दिसतात. यामध्ये काही वृक्षांच्या खोडाची बुंध्यापासूनच साल काढून टाकण्यात आली असून यामधून मानवी विकृ तीही स्पष्ट होते. झाडे बहरण्याऐवजी निष्पर्णच अधिक होत आहे. वाळलेले झाड तोडताना कोणत्याही प्रकारचा आक्षेप कोणाकडूनही घेतला जात नाही. त्यामुळे झाड वाळले की त्याच्या बुंध्यावर घाव घालून मिळणाऱ्या लाकडाची विक्री करण्याचा ‘उद्योग’करणारी यंत्रणाही यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संध्याकाळनंतर तपोवन, पाथर्डी, गौळाणे, वडनेर, संसरी, गंगापूररोड या भागातून थेट वृक्षांची तोड करून फांद्या भरून वाहतूक करणारी वाहनेही नजरेस पडतात, असे काही पर्यावरणप्रेमींनी सांगितले. परिसरांवर लक्ष ठेवून वृक्षांना रसायनांचे ‘डोस’ देऊन झाडे मृत केली जात आहेत.
झाडांवर विषप्रयोग...
By admin | Published: February 21, 2016 11:05 PM