ब्राम्हणगाव : जुनी शेमळी ता . सटाणा येथील एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील विहिरीसह गोठफॉर्म जवळील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून संपूर्ण पाणी दूषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृषी,महसूल व पोलीस प्रशासनाने अद्यापही दखल न घेतल्याने बच्छाव कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. जुनी शेमळी येथील एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील घरालगत असलेल्या विहिरीत गोठाफॉर्मच्या जवळील पाण्याच्या टाकीत व विहिरीत विषारी औषध टाकून पाणी दूषित केले. सदरची ही बाब मंगळवारी लक्षात आल्यावर बच्छाव यांनी विहिरीतील दुषित पाणी सटाणा लॅबमध्ये तपासणीसाठी आणले असता सदरचे पाणी नमुना तपासणी पुणे येथे होऊ शकत असल्याने रवाना करण्यात आले.सदरची घटना गावांत समजली असता सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,व परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी कृषी अधिकारी, महसूल विभागाचे तलाठी यांना ही बाब लक्षात आणून देत त्यांनी आपले हात वर करीत आपण काहीही करू शकत नसल्याचे उडवाउडवीची उत्तरे दिली. सटाणा पोलिसांकडेतक्र ार दाखल करण्यास गेले असता पोलिसांनी दोन दिवस उलटूनही पंचनामा करण्यासाठी न आल्याने बच्छाव कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. बच्छाव यांच्या शेतीविहीरितून शेती पिकबरोबरच जनावरांचे पिण्याचे पाणी दिले जात होते. घरालगत असलेल्या गोठफॉर्म मध्ये तीस शेळी,तीस बोकड व पाठ, दोन गायी,दोन म्हैस, एक बैलजोडी यांनी हे विषारी पाणी प्यायले असते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता. मात्र वेळीच विहिरीत पाण्याचा रंग बदलांमुळे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ शेती व जनावरांचा चारा,पाण्यासाठी वापर केला नाही. या घटनेची पोलिसांत तक्र ार दाखल करण्यात आली असून अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी बच्छाव कुटूंबियांसह ग्रामस्थ, व शेतकºयांनी केली आहे.