तालुक्यातील शेतकऱ्यांची जनावरे चोरीच्या घटनेत वाढ झाली असल्याने पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी गोवंश जनावरांची चोरटी वाहतूक, अवैध कत्तलखाने व उघड्यावर होणारी अवैध मांस विक्री रोखण्यासाठी एका स्वतंत्र पोलीस पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाद्वारे शहरातील कमालपुरा, मोमीनपुरा, मोती तलाव व गुलशेरनगर भागात छापे टाकून गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आली. या कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, या कारवाईदरम्यान रात्री-अपरात्री पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप माजी आमदार आसीफ शेख यांनी बैठकीत केला. शुक्रवारपासून कुरैशी समाजाच्या वतीने आंदोलनाचा पावित्रा घेऊन व्यवसाय बंद करण्यात येणार असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष अफजल खान कुरैशी यांनी बैठकीत दिली.
गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तलखाने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे व कुठल्याही दबावाला बळी न पडता कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांची नावे पोलिसांना देण्यात यावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी शिष्टमंडळाला केले. यावेळी कुरैशी समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
चौकट:-
मुंबई, औरंगाबादला वाहतूक
शहरातून मुंबई, औरंगाबाद येथे कंटेनरने अवैध मांसाची वाहतूक केली जात आहे. याबद्दल पोलिसांना सर्व माहिती आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत पोलिसांकडून मोठ्या माशांवर कारवाई न करता गोरगरिबांवर कारवाईचा बडगा उगारला जातो आहे, असा आरोप माजी आमदार आसीफ शेख यांनी पत्रकारांशी बोलताना केला.