पंचवटी : म्हसरूळ परिसरात श्री गणेशाची प्रतिष्ठापणा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांनी नियमांची पायमल्ली होणार नाही हे लक्षात घेऊन शांततेत गणेशोत्सव साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी केले.म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या वतीने दिंडोरीरोडवरील यशवंत मंगल कार्यालयात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला प्रमुख नगरसेवक शालिनी पवार, रंजना भानसी, अरुण पवार, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, शंकर पिंगळे, विशाल कदम आदिंसह मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे देणगी जमा करताना कोणाकडून जबरीने देणगी घेऊ नये, तसेच डीजे साउंड लावून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. जी मंडळे डीजे लावून नियमांची पायमल्ली करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी केले. या बैठकीला गणेशोत्सव मित्रमंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
डीजे लावल्यास पोलीस कारवाई करणार
By admin | Published: August 29, 2016 1:12 AM