नाशिक : गुरुवारी पहाटे एका संशयितास ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर वकिलासह काही नागरिकांनी मिळून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात शहरातील एका वकिलासह सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात संबंधित वकिलाकडून करण्यात आला.एरंडोल तालुक्यातील एका गुन्ह्यातील संशयित असलेल्या इफ्तेकार बशीर सय्यद या संशयिताला अटक करण्यासाठी एरंडोल पोलीस शहरात आले होते. या पोलिसांनी मुंबई नाका पोलिसांची मदत घेत गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पखालरोडवरील रॉयल कॉलनी लेन- १ मधील एका बंगल्यावर धडक दिली. दरम्यान, पोलिसांना इफ्तेखार त्या ठिकाणी आढळून आला; मात्र रमजान पर्वनिमित्त या घरात उपवासासाठी यावेळी सहेरीचा विधी सुरू असल्याने तत्काळ अटक करू नका, असे साजिद खान यांनी पोलिसांना सांगितले व मी माझ्या वकील मित्राला बोलावतो, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, असे सांगितले. दरम्यान, इफ्तेखार घरातून निसटला. अॅड. आसिफ अली अन्सारी हे यावेळी आले. त्यांनी पोलिसांना न्यायालयाची नोटीसबाबत विचारणा करत अन्य लोकांसह घेराव घालत पोलिसांना मारहाण केली. तसेच गुन्ह्यातील संशयितांना पळण्यास मदत करत प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार पोलीस कर्मचारी राजेंद्र देवरे यांनी केली. अॅड. अन्सारीसह इफ्तेकार सय्यद, रियाझ शेख, फिरोज अशरफ खान, साजीद अशरफखान, इम्रान नजीर शेख, राहील रियाज शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी सातही संशयितांना अटक करत गुरुवारी (दि.१६) सायंकाळी न्यायालयात हजर केले असता अॅड. अन्सारी यांनी पोलिसांनीच आपल्याला बेदम मारहाण करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. आपण त्यांना समजावून सांगत असताना पोलीस उपनिरीक्षक चन्ना यांनी बेदम मारहाण केल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने अटक केलेल्या सातही संशयितांचा जबाब नोंदवून घेत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच अन्सारी यांच्या आरोपांचीही चौकशी करण्यास सांगितले आहे.
पोलीस-वकिलांत जुंपली
By admin | Published: June 16, 2016 11:38 PM