नाशिक : भद्रकाली परिसरात कोयता घेऊन दहशत पसरविणारा सराईत गुन्हेगार फरहान ऊर्फ दहशत यास भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़२४) दुपारी बेड्या ठोकल्या़ याबरोबरच एका कारची तपासणी करून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्या कारमध्ये धारदार शस्त्रे आढळून आली आहे़ चौकमंडईतील रॉबीन बिस्किट परिसरात संशयित तरुण कोयता घेऊन दहशत पसरवित असल्याची माहिती भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांना मिळाली होती़ त्यानुसार सूर्यवंशी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह चौक मंडईत धाव घेऊन संशयित फरहान ऊर्फ दहशत कलीम शेख (वय २०, रा. रॉबीन बिस्किटमागे, चौकमंडई) यास ताब्यात घेतले़ त्याच्याकडे एक धारदार कोयता आढळून आला़ फरहान हा नेहमी परिसरात दादागिरी व हफ्तेवसुली करीत असल्याने त्यास ‘दहशत’ ही उपाधीदेखील मिळालेली आहे.सराईत फरहान शेखविरोधात भद्रकाली व अंबड पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, निरीक्षक सूर्यवंशी यांनी परिसरातून त्याची धिंड काढून त्याची दहशत मोडून काढली़ याप्रकरणी पोलीसशिपाई एजाज पठाण यांच्या फिर्यादीवरून शस्त्रबंदी आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घटना पंचवटीतील सेवाकुंज परिसरात घडली़ या ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये धारदार शस्त्रे असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार सोमवारी (दि़२५) दुपारी पोलिसांनी कारची (एमएच १५ एएस १८७७) झडती घेतली असता चालकाच्या सीटखाली धारदार लोखंडी कोयता मिळून आला. याप्रकरणी वैभव ज्ञानेश्वर तुपे, देवा राजेंद्र कुराडे व सुरज नंदराज चौधरी (रा. तिघे दिंडोरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गाळ्यांच्या शटरची चोरीपंचवटीतील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील चार ते पाच गाळ्यांचे शटर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २० ते २४ सप्टेंबर या कालावधीत घडली आहे़ बिल्डिंग नंबर चारमधील गाळा नंबर ८ व इतर चार ते पाच गाळ्यांचे शटर चोरून नेण्यात आले आहेत़ याप्रकरणी पोलीसशिपाई जाधव यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुचाकीची चोरीपंचवटीतील गुरूगोविंदसिंग हाउसिंग सोसायटीतील रहिवासी एकबालसिंग गुरुनामसिंग बाबरा यांची ५० हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड दुचाकी (एमएच १५ जीएम ९६४६) चोरट्यांनी दि. २ सप्टेंबरच्या मध्यरात्री आडगाव शिवारातील समर्थनगरमधील तुंगभद्रा अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगार ‘दहशत’ यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:35 AM