पंचक येथील महापालिका रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रात शुक्रवारी रांगेत उभे असलेल्या नागरिकांना टोकन दिले होते. तीन दिवसांनंतर आज लस उपलब्ध झाल्याने सकाळपासून या केंद्रावर टोकनधारी व नवीन नागरिक रांगा लावून उभे होते. त्यात काही कार्यकर्ते आपल्या ओळखीच्या नागरिकांचे लवकर लसीकरण करण्यासाठी धडपड करीत होते. त्यामुळे रांगेतील नागरिकांनी एकच गोंधळ केला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केंद्रावर येऊन त्या ठिकाणी पुढारकी करणाऱ्या कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद देत पिटाळून लावले. त्यानंतर रांगेतील नागरिकांना नियमानुसार लसीकरण सुरू करून दिले. दरम्यान, नाशिक रोडच्या खोले मळा येथे १८ ते ४५ वयोगटात नोंदणी केलेल्यांचे लसीकरण शांततेत पार पडले.
प्रत्येक पात्र नागरिकाचे कोविड लसीकरण होणार असून, नागरिकांनी संयम ठेवावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बिटको कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी केले आहे.