लासलगाव : पोलिसांनी परिसरात जमावबंदीनंतर कोणी रस्त्यावर फिरताना आढळल्यास कारवाईचा इशारा देऊनही बाजारतळात दुर्लक्ष करणाºया युवकांना काठीचा प्रसाद दिला. तर कोरोनामुळे लासलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी जीवनावश्यक वस्तू विक्री दुकानांना ग्राहकांसाठी अंतराच्या निशाणीच्या सूचना दिल्या. पांढºया रंगाचे मार्किंग करून नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी केले. कोरोनामुळे बुधवारी सलग चौथ्या दिवशी जीवनावश्यक वस्तू विक्री दुकानेवगळता इतर सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत, त्यामुळे मुख्य रस्त्यासह लहान रस्त्यांवर किरकोळ मनुष्य दिसत असल्याने मंगळवारी कोरोनामुळे लासलगावी कर्फ्यू सुरू आहे. सकाळी किराणा तसेच दूध विक्री करणाऱ्यांकडे खरेदीकरिता लोकांनी गर्दी केली होती. लासलगाव बसस्थानकावरदेखील शुकशुकाट होता. लासलगाव रेल्वेस्थानकदेखील निर्मनुष्य झाले आहे. लासलगाव बाजार समितीचे शेतीमालाचे लिलावही बंद होते.लासलगाव येथे १४४ कलम लागू असून, त्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणाºयाविरुद्ध लासलगाव पोलीस कारवाई करून गुन्हा दाखल करतील, असे रंजवे यांनी सांगितले. लासलगाव परिसरात उपनिरीक्षक आर. एस. सोनवणे, राजेंद्र पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त सुरू आहे.
लासलगाव येथे रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:20 PM