नाशिक :लोकसभा निवडणूक काळात कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला बाधा पोहचविणाऱ्यांची गय केली जाणार नसून बेकायदेशीरपणे जमाव जमविण्याचा प्रयत्न केल्यास अथवा दंगल घडविण्याच्या हालचाली केल्यास त्यावर तत्काळ पावले उचलून दंगा नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचे इंदिरानगर पोलीस ठाणेकडून राजीवनगर झोपडपट्टी परिसरात रंगीत तालमीतून दाखवून देण्यात आले.सोमवारी (दि.१५) सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान राजीवनगर झोपडपट्टी परिसरात शंभर फुटी रस्त्यावर अचानक जमावाने दंगा करण्यास सुरु वात केल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला समजली. तत्काळ पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. जमलेल्या जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच अग्निशामक दलाच्या बंबाची मदत घेत पाण्याचा मारा करत गर्दीवर नियंत्रण मिळवून परिस्थितीत नियंत्रणात आणली. काही वर्षांपुर्वी या भागात मदरशाच्या भिंतीचे बांधकाम तोडल्याच्या कारणावरून मोठी दंगल उसळळी होती. अचानकपणे रस्त्यावर आलेल्या पोलीस फौजफाट्याने परिसरातील नागरिक धास्तावले तसेच गुन्हेगारांचेही धाबे दणाणले. यावेळी पोलिसांनी दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम असल्याची उद्घोषणा ध्वनिक्षेपकावरून केल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक आबा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक रोहित शिंदे, उपनिरीक्षक अंकुश लांडगे, उपनिरीक्षक जगदीश गावित यांच्याहस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
पोलीस सतर्क : राजीवनगरला दंगलीची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 2:03 PM
राजीवनगर झोपडपट्टी परिसरात शंभर फुटी रस्त्यावर अचानक जमावाने दंगा करण्यास सुरु वात केल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला समजली. तत्काळ पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले.
ठळक मुद्देअग्निशामक दलाच्या बंबाची मदत सौम्य लाठीमार करत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या