नाशिक : ओडिसामधील गांजा तस्करी प्रकरणात सुमारे महिनाभरापासून फरार असलेली शिवसेनेची महिला कार्यकर्ता तथा प्रमुख संशयित लक्ष्मी रवींद्र ताठे (रा़ पंचवटी) हीस गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले़गांजा तस्करीतून मिळालेल्या पैशांच्या जोरावर राजकीय वलय प्राप्त करून लक्ष्मी ताठे ही गडगंज श्रीमंत झाली असून, तिने मोठी मालमत्ता कमविल्याचा पोलिसांना संशय आहे़ दरम्यान, ताठे हीस शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता गुरुवार (दि़१२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, गांजा तस्करीतील प्रमुख साथीदार, वितरण व्यवस्थेतील कडी आदींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे़ १२ जून रोजी पंचवटीतील तपोवनात गुन्हे शाखेने एका आयशरमधून ओडिसा येथून आणलेला ६९० किलो गांजा जप्त केला होता़ या प्रकरणात पोलिसांनी आयशरचालक, क्लीनर, सिन्नर व जळगाव येथील प्रत्येकी एक व ओडिसा येथील दलाल अशा पाच संशयितांना अटक केली़ नाशिकमधील महिला व तिचा साथीदार ओडिसा येथून गांजा आणून त्यांची संपूर्ण राज्यभरात वितरण करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले़ या घटनेनंतर महिला आपल्या कुटुंबीयांसह फरार झाली होती़ पोलिसांनी गांजा तस्करीचा सखोल तपास करून सिन्नरमधूनही ३९० किलो गांजा जप्त केला होता़या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार असून, संशयित महिला लक्ष्मी ताठे ही मध्य प्रदेशातील सेंधवा येथे असल्याच्या माहितीवरून मुंबईला फरार होण्यापूर्वीच अटक केली़ त्यानंतर तिला नाशिकला आणल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले़ पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी करतानाच हा व्यवसाय केव्हापासून केला जातो, यामध्ये किती संशयित सहभागी आहेत तसेच यातील मुख्य सूत्रधारास अटक ही कारणे देण्यात आली होती़
गांजा तस्करीतील लक्ष्मी ताठेला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:30 AM