लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील आनंदवली, गंगापूररोड परिसरात राहणारे दोघे सराईत गुन्हेगार गावठी पिस्तूल व काडतुसे घेऊन विक्रीसाठी निफाड तालुक्याच्या हद्दीत आल्याची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेला लागली होती. त्यानुसार पोलिसांनी चांदोरी-सायखेडा चौफुलीवर सापळा रचला. सापळ्यात एक गुन्हेगार अडकला, मात्र दुसरा मोटारीतून पळून जाण्यास यशस्वी ठरला. त्याचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला.स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी कर्मचाºयांसमवेत सोमवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास सायखेडा चौफुलीवर सापळा लावला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोघे संशयित लोगान मोटारीमधून (एमएच १५, ई ७३४८) आले. त्यांच्यापैकी संशयित गणेश बबनराव धुमाळ (३६) पिस्तूल विक्रीसाठी खाली उतरून ग्राहकाची प्रतीक्षा करीत होता. याचवेळी पोलिसांनी झडप टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल व सात जिवंत काडतुसे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याचवेळी दुसरा संशयित मोटारीतून पसार होत असताना पोलिसांच्या पथकाने तत्काळ त्या मोटारीचा पाठलाग सुरू केला. लाखलगाव परिसरात पोलिसांनी सदर मोटार अडविण्याचा प्रयत्न केला मात्र, संशयिताने त्यांना तेथेही चकमा देऊन मोटार पुढे पुणे महामार्गाच्या दिशेने दामटविली.
पोलिसांनी त्वरित बिनतारी संदेशवहन यंत्राद्वारे जिल्ह्यासह शहर व परिसरात नाकाबंदी पॉइंटला संदेश पाठवून मोटारीचे वर्णन आणि क्रमांक कळविला असता कुठल्याही नाकाबंदी पॉइंटवर सदर संशयित मोटार आढळून आली नाही. पथक सदर संशयित मोटारीच्या मागावर होते. पथकाने त्वरित शहरातील कर्मचाºयांना सूचना देत सामनगावमार्गे सिन्नर फाटा परिसरात सापळा रचण्यास सांगितले. दुसºया पथकाने पाळत ठेवली मात्र संशयित मोटार सिन्नर फाट्यावरील सापळ्यातून पळून जाण्यास यशस्वी ठरली.