नाशिक : लोकसभा निवडणूकीदरम्यान कायदासुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशी कुठल्याहीप्रकारे अनुचित घटना शहर व परिसरात घडू नये, म्हणून गुन्हेगारांची तपासणी व धरपकड करण्यासाठी पोलिस आयुक्तालय हद्दीत गुरूवारी (दि.१८) ‘मिशन आॅल आउट’ही विशेष मोहिम पोलिसांनी राबविली. यावेळी १३० सराईत गुन्हेगारांपैकी ९४ गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, ५७ तडीपार गुंडांची तपासणी करण्यात आली.शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय ४ पथके तयार करून मोहिम राबविली. या मोहिमेला रात्री ११ वाजता एकाचवेळी सर्वत्र प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, सर्व पोलीसठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांची यादी घेत पोलिसांनी परिसरात झाडाझडती घेतली. दहशत पसरवून शरीर व मालमत्तेविरूध्द गुन्हे करण्याची शक्यता असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. तडीपार गुन्हेगारदेखील यावेळी तपासण्यात आले. दरम्यान, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वडाळागावात एक तडीपार व मुंबईमधील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला. तसेच पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत तडीपार गणेश भास्कर याच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. विविध जबरी गुन्ह्यांमध्ये हवे असलेले ६४ पैकी ९ गुन्हेगार पोलिसांना मिळून आले. यावेळी शहर व परिसरातील १३३ हॉटेल, लॉज, ढाबे तपासण्यात येऊन ६ ढाबे, लॉजवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.सर्व पोलीस ठाणे हद्दीत एकाचवेळी मोठ्या संख्येने पोलीस रस्त्यावर उतरल्यामुळे गुन्हेगारांची पाचावर धारण बसली. काहींनी आश्रय घेतलेले ‘अड्डे’ सोडले तर काहींनी लपून बसणे पसंत केले. यावेळी ९४ गुन्हगेर पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही तडीपार गुंडांचाही समावेश आहे.-६८ हजारांचा गुटखा जप्तगुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने मिशन आउटदरम्यान, मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत पथक गस्तीवर असताना पोलीस शिपाई दिपक जठार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रारोड वडाळानाका पसिरात केसेंट चेंबरमध्ये राहत्या घरात संशयित अब्दुल मुजाहित शेख याने हिरा पानमसाला, रॉयल ७१७ तंबाखू, सुगंधित पानमसाला, जाफराणी जर्दा, आरडीएम पान मसाला, विमल पान मसाला, व्ही-१तंबाखूचा साठा सुमारे ६८ हजार ८६० रूपयांचा साठवून ठेवल्याचे आढळून आले. पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा मारून संशयित शेख यास ताब्यात घेतले.