पंचवटी : वाढती लोकसंख्या, प्रशासकीय कामकाज तसेच अन्य पोलीस आयुक्तालयांपेक्षा नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची कमी असलेली संख्या, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील त्र्यंबकेश्वर, सिन्नर, वाडीवºहे या तीन पोलीस ठाण्यांचा लवकरच पोलीस आयुक्तालय हद्दीत समाविष्ट होणार आहे. एकूणच आयुक्तालयाची यामुळे हद्द वाढणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे.नाशिक पोलीस आयुक्तालयात पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, अंबड, नाशिकरोड, देवळाली, उपनगर, सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर, भद्रकाली, गंगापूर, सातपूर या तेरा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. आगामी कालावधीत शासनाकडून सिन्नर, त्र्यंबकेश्वर, वाडीवºहे अशा तीन पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर सदर पोलीस ठाणे नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाला जोडले जाऊन त्यांचा पोलीस आयुक्तालयात समावेश होऊ शकतो. आगामी कालावधीत नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या १३ वरून १६पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना आता पुन्हा वेग आला आहे.ग्रामीणमधील त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि वाडीवºहे अशी तीन पोलीस ठाणे नाशिक पोलीस आयुक्तालयाकडे वर्ग करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करायचा असल्याने संबंधित पोलीस ठाण्यांचा सध्याचा नकाशा, नाशिक ग्रामीण जिल्ह्याची हद्द दर्शविणारा नकाशा व संबंधित पोलीस ठाणे वर्ग केल्यानंतर उर्वरित नाशिक ग्रामीणची हद्द दर्शविणारा अभिप्रायासह एकत्रित नकाशा कार्यालयाला कळविण्याबाबत पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पत्रव्यवहार प्रशासकीय पातळीवर करण्यात आला आहे.देवळाली कॅम्प, अंबडचेही होणार विभाजननाशिक शहराला विशेष पोलीस महानिरीक्षक पद आहे. पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी अपर पोलीस महासंचालक पद आहे. तसे पद नाशिकलादेखील करण्याच्या विचारात गृहविभाग आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात आले आहे. पुढील काही महिन्यांत अंबड, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांचेदेखील विभाजन होणार असल्याची चर्चा आहे. वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने प्रशासनाकडून बदल केले जाण्याची शक्यता आहे.ग्रामीणमधील तीन पोलीस ठाणे वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे; याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसून कार्यवाही सुरू आहे. वाढत्या शहरीकरणातून भविष्यात आयुक्तालयाकडे ग्रामीणचे पोलीस ठाणे वर्ग होऊ शकते.- डॉ.आरती सिंह, अधीक्षक
पोलीस आयुक्तालय हद्द वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:57 PM