नाशिक : तक्रार अर्जाच्या चौकशीत तक्रारदाराचा धनादेश न वटल्याचे प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्याविरूद्ध व्याजाने पैसे दिले अशी खोटी तक्रार नोंदवू नये, यासाठी तक्रारदार यांच्याकडे २० हजारांची लाच मागणाऱ्या आडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार संशयित राजेश हरी थेेटे (५३) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले राजेश थेटे यांनी तक्रारदार युवकाकडे २० हजारांची लाचेची २५ एप्रिल रोजी मागणी केली होती.
याप्रकरणी तक्रारदार युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. विभागाच्या सापळा कारवाई पथकाने तक्रारीमध्ये तथ्य तपासले असता संशयित थेटे हे लाचेची मागणी करत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, थेटे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.