नाशिक : शहर पोलिस मुख्यालयात मोटर ट्रान्सपोर्ट विभागातील शहरातील गस्तीपथकाच्या पेट्रोलिंग चेकींग- ३ मोबाईल वाहनावरील चालक पोलिस शिपाई मोहन बोरसे (रा. बोरगड, मूळ रा. मुंबई) यांनी शुक्रवारी (दि. १९) सकाळी सहा वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर पोलिस दलातून मोहन बोरसे यांची जुलै २०२० मध्ये बदली झाली होती. त्यानंतर ते नाशिकमधील बोरगड परिसरात राहत होते. मोटार ट्रान्सपोर्ट विभागातील शिस्तप्रिय आणि सोज्वळ स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळख असलेले मोहन बोरसे यांनी गुरुवारी रात्री शहर पोलिसांच्या चेकिंग मोबाईलवर ३ वाहनावर चालकाचे कर्तव्य बजावल्यानंतर वाहन पुन्हा मोटार ट्रान्सपोर्ट विभागात पार्क केल्यानंतर सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याच वाहनावर उभे राहून पत्राच्या शेडच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सरकारवाडा पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची नोंद घेवून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, चार दिवसापूर्वीत म्हसरूळ भागातील सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवदास भाऊराव निकम (५६ ) यांनी आजारपणाला कंटाळूनआत्महत्या केली होती. त्यामुळे नाशिक पोलिस दलात चार दिवसात दुसरी आत्महत्या घडल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.