नाशिकरोड : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळालीगाव रोकडोबावाडी, जय भवानीरोड, आम्रपाली झोपडपट्टी आदी भागांमध्ये मंगळवारी सायंकाळी युवक, लहान मुले एकत्रित गर्दी करून गप्पागोष्टी करत असताना उपनगर पोलिसांनी विविध पथकाद्वारे त्या ठिकाणी धाव घेऊन काठीचा प्रसाद देत सर्वांना पिटाळून लावले.
पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरातील रहिवाशांनी स्वागत केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने ब्रेक द चेन म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी न येता घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील मंगळवारी सायंकाळी देवळालीगाव रोकडोबावाडी, सुंदरनगर, जय भवानीरोड, आम्रपाली झोपडपट्टी आदी परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिक व महिला यांना टवाळखोर यांपासून त्रास होत असल्याबाबत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना माहिती मिळाली. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी कर्मचारी व महिला कर्मचारी यांची टीम बनवून सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून गप्पा गोष्टी करणाऱ्या युवकांना लाठीचा प्रसाद देत घरी पिटाळून लावण्यात आले. आर्टिलरी सेंटररोड खोले मळा येथे नाकाबंदीचे ठिकाणी विनाकारण वाहनांवर फिरणाऱ्या वाहनधारकांवरदेखील दंड करून कारवाई करण्यात आली. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पोलिसांनी टवाळखोरावर केलेल्या धडक कारवाईचे नागरिक व महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळी, तेजल पवार, महिला कर्मचारी बेबी फड, मयूरी विजेकर, ललिता पवार, पोलीस कर्मचारी रोहित भावले, सतीश मढवई, राहुल खांडबहाले, शांताराम बोराडे, गणेश गोसावी आदी सहभागी झाले होते.