नाशिक : दामदुप्पट परताव्याचे आमीष दाखवून लोकांकडून लाखो रूपयांची गुंतवणूक करत आर्थिक फसवणूक करणा-या माऊली, संकल्पसिध्दीचा संचालक संशयित विष्णू रामचंद्र भागवतविरूध्द मुंबईनाका, अंबड पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात भाजपाचा पदाधिकारी सुनील खंडेराव आडके यासदेखील न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि.२४) पोलीस कोठडी सुनावली.शहराच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून भागवतच्या संपत्तीवर प्रथमत: टाच आणण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, या गुन्ह्याचे तपासी अधिकारी समीर शेख यांनी भागवत प्रकरणाच्या तपासाला गती दिली. पाटील यांच्या आदेशान्वये शेख यांच्या पथकाने भागवत्या २७ बॅँक खाती गोठविली. त्यानंतर त्याच्या दलालांनी ज्या महागड्या कार ठेवीच्या रकमेतून भागवतकडून कर्ज घेऊन खरेदी केल्या होत्या, त्यादेखील पोलिसांनी राज्यातील विविध शहरांमधून जप्त केल्या. या कारची किंमत सुमारे ४ कोटी ८लाख ६ हजार ६०९ रूपयांच्या डझनभर कार ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.भागवत यास जमिनीच्या खरेदीविक्रीसाठी लागणारे दस्तऐवज बनावटरित्या तयार करून देण्यात आडके यांनी हातभार लावल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. भागवत याने नागरिकांचा हडपलेला पैसा जमिनींच्या खरेदीमध्ये गुंतविल असून या व्यवहारांमध्ये आडके याचा सक्रीय सहभाग पोलीस तपासात समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यास अटक केली.त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सिडकोमधील एका मोठ्या नामांकित बांधकाम प्रकल्पाच्या सदनिकेतून भागवतच्या मुसक्या बांधल्या असून तोदेखील कोठडीत आहे. त्याच्या नऊ दलालांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्यांना न्यायालयापुढे उभे केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दलालांच्या कोठडीत गुरूवारपर्यंत (दि.२०) वाढ केली. तसेच आडकेच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत (दि.२४) वाढ करण्यात आली.
भागवतच्या जमिनविक्रीत सक्रीय सहभाग घेणाऱ्या आडकेला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:50 PM
या गुन्ह्यात भाजपाचा पदाधिकारी सुनील खंडेराव आडके यासदेखील न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि.२४) पोलीस कोठडी सुनावली.
ठळक मुद्देभागवतविरूध्द मुंबईनाका, अंबड पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे भागवत्या २७ बॅँक खाती गोठविली