नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असतांना तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांची पोलिस आणि मनपा पथकाच्या वतीने पंचवटी कारंजा येथे धरपकड सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांना पोलिस वाहनात बसवून तपासणी करण्यासाठी लागलीच रुग्णालयात मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात नेले. जवळपास 50 हुन अधिक बेशिस्त नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत रुग्णालयात नेले आहे.
नाशिक शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असून त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतीच बैठक घेऊन कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलीस अशा दोन्ही यंत्रणा कामाला लागल्या असून मास्क न लावणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात येत आहे त्या पलीकडे जाऊन आज ही कारवाई करण्यात आली. पंचवटी येथे मास्क न लावणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली.या मोहिमेत सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव, मनपा विभागीय अधिकारी विवेक धांडे, पोलिस निरीक्षक अशोक भगत, सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख आदिंसह पथक सहभागी झाले आहे.