जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयात विविध दराच्या चलनी नोटा छापल्या जातात. गेल्या सहा महिन्यापासून मुद्रणालयातून पाचशे रुपयांच्या नोटांचा बंडल क्रमांक १६४ उपसर्ग क्रमांक ५ टीएच नोटांच्या क्रमांकाची मालिका १६४००१ ते १६५००० अशा एक हजार नोटा (दहा बंडलचे एक पाकीट) प्रारंभी गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र शोधाशोध करूनदेखील नोटांच्या बंडलचे पाकीट सापडले नाही. याबाबतचा अहवाल मुद्रणालयाच्या व्यवस्थापनाकडून दिल्ली येथील उपमुख्य सतर्कता अधिकारी सुनील तिवारी यांना पाठविण्यात आला होता. गहाळ झालेल्या नोटांच्या पाकिटाचा शोध घेण्यासाठी मुद्रणालय प्रशासनाने सहाय्यक व्यवस्थापक एस. आर. वाजपे व व्ही.एम. पासबोला या दोन सदस्यांची ‘फॅक्ट फाइण्डिंग कमिटी’ गठित केली होती. कमिटीने पॅकिंग ब-सेक्शन व इतर विभागातील कामगारांसह अधिकारी सुरक्षा रक्षक यांची विचारपूस करत चौकशी केली. सुमारे पाच महिने या समितीकडून मुद्रणालय परिसरात गायब झालेल्या नोटांच्या बंडलचा शोध घेतला जात होता. त्यानंतर याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञात कामगार, अधिकारी व सुरक्षारक्षक यांच्याविरुद्ध पाच लाखांची रोकड चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
--इन्फो--
कोरोनाच्या लाटेचा तपासावर परिणाम
कोरोना प्रादुर्भावामुळे मुद्रणालयात कामगारांची संख्या ही कमी होती. त्यामुळे काही सेक्शन बंद असल्याने तपासात अडथळा निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा जून महिन्यात कमिटीने सर्व सेक्शनमधील अधिकारी व कामगारांची कसून चौकशी केली. तरीदेखील पाच लाखाच्या नोटांच्या बंडलचे पाकीट सापडले नाही. त्यामुळे तसा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात आला.
--इन्फो---
कचरा डेपोपासून प्रसाधनगृहापर्यंत कसून तपासणी
मुद्रणालयातील यांत्रिकीकरण कक्ष, अन्य सर्व अडगळीची संशयित ठिकाणे, स्क्रॅप सेक्शन, कचरा डेपो, ड्रेनेज चेंबर, प्रसाधनगृह आदी सर्व ठिकाणी फॅक्ट फाइण्डिंग कमिटीद्वारे तपासणी या पाच महिन्यांत करण्यात आली होती; मात्र तरीसुद्धा नोटांच्या बंडलचा ठावठिकाणा लागला नाही. नोटा छपाई, पॅकिंग या सर्व प्रचलित प्रक्रियेमध्ये चुकून नोटांचा बंडल आडबाजूला ठेवला गेला का, याबाबतही अत्यंत बारकाईने तपासणी करण्यात आली तरीही समितीच्या पदरी अपयश आले.
---
पोलिसांची अधिकारी, कामगारांकडे चौकशी
बुधवारी सकाळी पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक निरीक्षक संतोष खडके यांनी तब्बल दोन तास चलार्थपत्र मुद्रणालयाची पाहणी केली. नोटा छपाई ते पॅकिंग याबाबतची मुद्रणालयाची प्रचलित प्रक्रिया समजून घेतली. अधिकारी व कामगार यांच्याशी बोलून तेथील कामाची पद्धत, कामगार येताना व मुद्रणालयातून बाहेर जाताना होणारी त्यांची तपासणी, सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व्हर रूम, स्क्रॅप सेक्शन, कचरा डेपो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवानांकडे विचारपूस केली. गुरुवारपासून या गंभीर चोरीच्या तपासाला गती मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.