इंदिरानगर : पेठेनगर येथील लुथा हॉटेलच्या कॅश काउंटरवर बसलेल्या हॉटेलचालकाला एका पोलीस मित्राने जेवणाचे बिल का मागितले, असा प्रश्न करीत शिवीगाळ केली. तसेच चारचाकीच्या बोनेटच्या साहाय्याने काही मीटर अंतरापर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत हॉटेलचालक बालंबाल बचावले. फिर्यादी कुशल संजय लुथरा (२५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अजय ठाकूर याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी (दि.१७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी कुशल हे लुथा हॉटेलमध्ये काउंटरजवळ बसलेले होते. यावेळी ठाकूर तेथे आला व त्याने पनीर चिलीची ऑर्डर दिली. यावेळी कुशल यांनी पनीर चिल्लीचे २२१ रुपये बिल देण्यास सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या खिशातून ओळखपत्र काढत ते दाखवून स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचे भासविले. त्याने जेवणाचे पैसे न देता शिवीगाळ करून हॉटेलमधून काढता पाय घेतला. तेव्हा त्यांच्या हॉटेलचा वॉचमन उदय पंडित यानेही धाव घेतली. पंडित याने मोटारीच्या चालक बाजूचा दरवाजा उघडला व त्यास खाली उतरण्यास सांगितले. त्याने गाडी पुढे घेत लुथरा यांना धक्का मारला. त्यामुळे ते गाडीच्या बोनटवर पडले आणि त्यांनी कारचे बोनेट धरले. तरीदेखील चालकाने कार थांबविली नाही तर लुथरा यांना तसेच फरपटत मुंबई नाक्याच्या दिशेने नेले. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ जोराने ब्रेक लावले असता लुथरा बाजूला फेकले गेले. कारचालकाने थांबून त्यांची मदत करण्याऐवजी तेथून पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयित ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून ठाकूर हा फरार झाला आहे.
--इन्फो--
‘...म्हणे मी क्राइम ब्रँचचा अधिकारी आहे’
संशयित अजय ठाकूर याने स्वत:ला मी क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगून खिशातून कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेले पोलीस मित्राचे ओळखपत्र दाखविले आणि शिवीगाळ करत दमबाजी केल्याचे जखमी कुशलचे वडील संजय यांनी सांगितले. त्याचा संपूर्ण प्रताप हा हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.
--
--इन्फो--
पोलिसांच्या ‘मैत्री’चा गैरफायदा
पोलीस प्रशासनाने मदतनीस म्हणून दीड वर्षापूर्वी चौक बंदोबस्तासाठी लॉकडाऊन काळात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘पोलीस मित्र’ म्हणून काही स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती. त्यांना त्यावेळेस ओळखपत्रही देण्यात आले होते. त्यांच्यापैकीच एक हा संशयित अजय ठाकूर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ठाकूर हा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माऊली लॉन्सच्या परिसरात वास्तव्यास आहे. त्यामुळे त्याच्याकडे नेमके कोणत्या पोलीस ठाण्यांतर्गत ‘पोलीस मित्र’चे ओळखपत्र आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
--कोट--
इन्फो---
स्विफ्ट डिझायर कारने माझा मुलगा कुशल यास संशयित ठाकूर याने फरपटत काही मीटरपर्यंत नेले. सुदैवाने माझ्या मुलाचे प्राण वाचले. त्याने जेवणाचे बिल देण्यावरून हॉटेलमध्ये वाद घातला कुशलच्या हातास व पायाला मार लागला आहे. तसेच डाव्या बाजूच्या पायाला फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने पोलीस मित्राचे ओळखपत्र दाखवून स्वत:ला क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे तो सांगत होता.
-संजय लुथरा, जखमी कुशलचे वडील