पंचवटी : मयत पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांना देवळाली कॅम्प येथे सैन्यदलात नोकरी लावून देण्याचा बहाणा करून मयत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीकडून रोख व धनादेश स्वरूपात तब्बल साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या घटनेतील संशयित पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्याजवळ सत्यम पार्क येथील मयत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार राजू शंकर अहिरे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यम पार्क परिसरातील पोलीस कर्मचाऱ्याचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर मुलांना नोकरी लागावी म्हणून मखमलाबाद त्यांच्या पत्नीने विवेकानंदनगर येथील राहणाऱ्या संशयित अहिरे याला सांगितले होते. यासाठी अहिरे याने तक्रारदार महिलेकडून वेळोवेळी रोख व धनादेश स्वरूपात साडे सहा लाख रुपयांची रक्कम घेऊन त्या बदल्यात सैन्य दलात नोकरीची खोटी ऑर्डर महिलेच्या पत्त्यावर पाठविली. त्यानंतर मुलांची नावे चुकल्याचे सांगून पाठविलेले पॉकेट फोडू नका असे सांगून ते परत घेऊन वेळोवेळी नोकरीचे खोटे आश्वासन देत फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी महिलेने केली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.