नाशिक : कॉलेजरोड, गंगापूररोड या परिसरानंतर शहराचा सुशिक्षित व उच्चभू्र लोकांचा परिसर म्हणून नावारुपाला येणाºया अशोकामार्ग परिसरावर चोरट्यांनी वक्रदृष्टी केली आहे. सोनसाखळी ओरबाडण्यापासून तर घरफोड्यांपर्यंत विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत असल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.अशोकामार्ग येथील आयडीबीआय बॅँकेच्या एटीएमच्या पाठीमागे असलेल्या आदित्यनगरच्या रस्त्यावरील पुष्प पराग अपार्टमेंटच्या द्वारावर क्षमा श्रीकांत घोलप या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोनसाखळी ओरबाडून चोरट्याने दुचाकीवरून पळ काढला. सेवानिवृत्त न्यायाधीश श्रीकांत घोलप यांच्या त्या पत्नी आहे. रात्री दहा वाजेच्या सुमारास सोसायटीच्या प्रवेशद्वारावरून वाहनतळामध्ये जात असताना लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवर पाठीमागून आलेल्या चोरट्याने घोलप यांच्या गळ्यामधील सोनसाखळी ओरबाडून पखालरोडने वडाळागावाच्या दिशेने दुचाकी भरधाव दामटविली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जाबजबाब नोंदवून सदर भागात गस्त वाढविण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या. प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलेल्या मार्गावर पथकही तत्काळ रवाना झाले; मात्र सोनसाखळी लांबविणारा चोरटा हाती लागला नाही. तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी मुख्य अशोकामार्ग रस्त्यावरून येत असताना दुचाकीस्वाराने या भागातील रहिवासी गीता पंजवानी यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढला होता. या घटनेतील दोन्ही दुचाकीस्वारांना गुन्हे शाखेने महिनाभरापूर्वी अटक केली आहे. तरीदेखील सोनसाखळी चोरीच्या घटना अद्याप थांबलेल्या नाही. आठवडाभरापूर्वीच येथील रविशंकर मार्गाच्या चौफुलीवर संध्याकाळी महिलेच्या हातातील मोबाइल हिसकाविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. आम्रपाली हाईट्स या सोसायटीमध्येही काही दिवसांपूर्वी घरफोडी झाल्याचे या परिसरातील महिलांनी बोलताना सांगितले. येथील भाजीबाजार, कल्पतरुनगर परिसरातील दुकानांचा भाग, रविशंकर मार्ग परिसरात सातत्याने अशा गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशोकामार्ग हा परिसर मुंबई नाका व रविशंकर मार्ग हा परिसर उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्वीत आहे. अशोकामार्ग परिसरातील बहुतांश पथदीप नादुरूस्त असून जे सुस्थितीत आहे त्यांचाही पुरेसा प्रकाश पडत नाही.
पोलीस हतबल : अशोका मार्ग चोरट्यांच्या रडारवर निवृत्त न्यायाधीशांच्या पत्नीची सोनसाखळी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:18 AM