सातपूर : पोलिसांविषयीचा गैरसमज असेल तर मनातून काढून टाका, पोलीस तुमचे मित्र आहेत, असे शालेय विद्यार्थ्यांना सांगून सातपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधला.गेल्या काही दिवसांपासून सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिसांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांतर्गत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चटप, समाधान हिरे यांनी अशोकनगर येथील मॉडर्न विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील कामकाज, कायदे, वाहन चालविण्याचा परवाना, कौटुंबिक हिंसाचार, विविध उपक्रम, महाविद्यालयात होणारे रॅगिंग, गुन्हेगारी, समज-गैरसमज याविषयीची सविस्तर माहिती दिली. आणि पोलिसांशी मैत्री करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका, समस्या, प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना विचारून समाधान करून घेतले. संस्थेचे अध्यक्ष किसनराव विधाते यांनी विद्यालयाची माहिती दिली. प्रास्तविक मुख्याध्यापक स्मिता गायधनी यांनी केले. सूत्रसंचालन लीना महाले यांनी केले. आभार श्रीमती कुलथे यांनी मानले. (वार्ताहर)
पोलिसांनी केले विद्यार्थ्यांशी हितगुज
By admin | Published: December 13, 2015 11:13 PM