गेल्यावर्षी कोरोनाचे महासंकट आल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाऊन निर्बंध घातले होते. त्यावेळी कोणते व्यवसाय सुरू राहतील, कोणत्या व्यवसायावर निर्बंध राहातील याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले होते. त्या आधारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीदेखील काही सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यात फेरफार करून असंबंध विषयांच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात वृत्तपत्रासंदर्भात अनेक गैरसमज पसरवणाऱ्या माहिती दिल्या गेल्या होत्या. जीवनावश्यक वस्तू बंद करण्यासारख्या अनेक सूचनांचा समावेश आहे. कोरोनाकाळात काळजी घेण्याच्या नावाखाली वृत्तपत्रांविषयीदेखील गैरसमज पसरवणारी महिती देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने हे प्रकार गांभीर्याने घेऊन चुकीचे संदेश व्हायरल करणाऱ्यांची दखल घेण्याचे आदेश पोलीस दलाला देण्यात आले होते. मात्र वर्षभरात पोलिसांना अशाप्रकारे गैरसमज पसरवणारे कोण याचाच शोध घेता आलेला नाही. त्यामुळे समाजकंटकांचे फावले आहे. जुनेच संदेश पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडिया विशेषत: व्हॉट्सॲपवर पाठवले जात आहेत.
मुळात प्रशासन आणि जनतेत दुवा साधण्याचे काम वृत्तपत्र करीत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले जात असताना वृत्तपत्रांविषयीच गैरसमज पसरवणे चुकीचे आहे, असे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. दरम्यान, आता तरी व्हॉट्सॲप अफवा पसरविणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इन्फो...
सोशल मीडियावर वृत्तपत्रांबाबत देण्यात आलेली माहिती अत्यंत अशास्त्रीय आणि निराधार स्वरूपाची आहे. वृत्तपत्रे ही पूर्णपणे सुरक्षित आणि कोराेनामुक्त असून, तसे स्पष्टीकरण आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. कोरोनाच्या पुन्हा आलेल्या संकटात अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असताना अत्यंत विश्वासार्ह माहिती पुरवण्याचे काम वृत्तपत्रांकडूनच केले जात आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.