नाशिक : त्र्यंबकरस्त्यावर शासकिय वसाहतीजवळ गॉगलविक्री करणाऱ्या वडाळागावातील रहिवासी असलेल्या ऐतेशाम ईशाद अन्सारी याच्यावर प्राणघातक हल्ला करून संशयित फरार झाले होते. या हलल्यात अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या हल्ल्यातील चौघा संशयितांना अटक केली आहे. या संशयित हल्लेखोरांची पोलिसांनी शहरातून ‘धिंड’ काढली.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, त्र्यंबकरस्त्यावरील एका प्रार्थनास्थळाजवळ अन्सारी हा स्टॉल लावून गॉगलची विक्री करीत होता. त्याच्याकडे चार ते पाच तरुणांचे टोळके गॉगल खरेदी करण्याच्या बहाण्याने आले. यावेळी खरेदी-विक्रीदरम्यान त्यांनी वाद घालून अन्सारीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अन्सारी गंभीर जखमी झाल्याने त्याचा रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. पोलिसांनी संशयिताविरुध्द दाखल केलेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा खूनाच्या गुन्ह्यात रुपांतरीत केला आहे. याप्रकरणी खूनाच्या हल्ल्यात मुंबईनाका पोलिसांनी एकूण सात संशयित हल्लेखोरांना अटक केली आहे. गॉगलविक्रे त्याची भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या हत्येच्या घटनेने समाजमन भयभीत झाले होते.
या हल्ल्यानंतर नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरणाबरोबरच हळहळही व्यक्त केली जात होती. भरदिवसा झालेल्या अशा प्राणघातक हल्ल्यामुळे शहराची कायदासुव्यवस्था कितपत सुरक्षित आहे, हे देखील चव्हाट्यावर आल्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव वाढला होता. तसेच मयत युवकाच्या नातेवाईकांसह मित्र परिवारानेही मंगळवारी मुंबई नाका पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली होती. तसेच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ.राजू भुजबळ यांना खासगी रुग्णालयात घेराव घालून मारेकऱ्यांना अद्याप का अटक के ली नाही, असा जाब विचारला होता. ऐतेशामच्या वडीलांनी तर हात जोडून पोलीसांपुढे विनवणी करत माझ्या मुलाचा बळी घेणाऱ्यांना फासावर कधी लटकवणार असा संतप्त प्रश्न केला होता. हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले होते. ज्या रस्त्यांनी हे हल्लेखोर पळाले त्या रस्त्यांवरील सीसीटीव्हीमध्ये हे वाहनांसह कै द झाले होते. या गुंडांची दहशत कमी व्हावी आणि गुन्हेगारीला वचक बसावा यासाठी पोलिसांनी त्यांची परिसरातून वरात काढली. प्राणघातक हल्ल्यातील प्रमुख संशयित आरोपी जितेंद्र भगवान काळे (रा. घनकर लेन), मुकेश चंद्रकांत साळवे (रा. मल्हारखाण झोपडपट्टी) मनीष रेवर (रा. रामवाडी) या तीघांच्या मुसक्या आवळल्या आहे़ तसेच त्यांचे दोन साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही; मात्र पोलिसांनी या तीघांना आश्रय व मदत करणाऱ्या संशयितांनाही शोधून काढले असून यामध्ये चेतन यशवंत इंगळे, अजिंक्य प्रकाश धुळे, विशाल अशोक निकम (सर्व रा. दहावा मैल, ओझर) आणि योगेश चंद्रकांत धांडे यांनाही अटक केली आहे. या सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि़ १९) पोलीस कोठडी सुनावली आहे.