सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, स्टेट बँक चौक, संभाजी चौक, पाथर्डी फाटा, अंबड यासह मुख्य रस्ते तसेच रहदारीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे होर्डीग, बॅनर्स, पोस्टर्स तसेच स्वागत कमानी उभारून विद्रुपीकरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मनपा व पोलीस यंत्रणेवर टिका होत असल्याने आगामी काळात महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे फलकबाजी करणाऱ्यांवर तसेच फलक बनवून देणाऱ्या प्रिंटिंग प्रेस चालकावर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी पाच जणांना नोटीस दिल्या आहेत तर काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तयारीही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सिडकोत सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी विविध गट व राजकीय पक्षांचे तीन ते चार अध्यक्ष निवडण्यात आले असून, एकमेकांवर वर्चस्व दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फलकबाजी करण्यात आली आहे. त्यातून वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच वादातून तीन दिवसापूर्वी त्रिमूर्ती चौकात शहरातील काही युवकांनी येत एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली होती.
चौकट ..
पोलिसांकडून सिडको तसेच अंबड भागात लावण्यात आलेल्या फलकबाजी करणाऱ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची माहिती घेतली जात असून, त्यांच्या विरुद्ध यापुर्वी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी अंबड पोलिसांनी सुरू केली आहे.