सातपूर : पायी फिरून संवाद साधण्याबरोबरच आता पोलीस अधिकाऱ्यांनी सायकल पेट्रोलिंगचा नवा प्रयोग सुरू केला आहे. पोलीस वाहनातून फिरणाऱ्या अधिकाऱ्यांना सायकल चालविताना पाहून नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण होत आहे.वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांमध्ये मिसळून संवाद साधण्याबरोबरच पोलीस मित्र तयार केले पाहिजेत, असा मंत्र पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पोलीस वाहनातून सायरन वाजवित फिरणारे पोलीस आता सायकलचे पॅडल मारताना पाहून नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटवर्क साधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. आपापल्या परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांची माहिती तत्काळ व्हॉट्सअॅप क्रमांकावर अपलोड करण्याचे आवाहनदेखील करण्यात येत आहे. या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.पोलिसांनी सुरू केलेल्या पायी संवाद, रिक्षांवर हेल्पलाइन क्रमांक, दिवाळीत गोरगरीब चिमुकल्यांना मिठाई वाटप आणि जनसंपर्क वाढविणे या विविध उपक्रमांसह आता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सायकलवर फेरफटका मारताना सातपूर परिसरात दिसून येत आहे. सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे, सहायक पोलीस निरीक्षक माधवी वाघ आदि अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सायकल पेट्रोलिंगचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पेट्रोलिंग दरम्यान नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकून घेतली जात आहेत. (वार्ताहर)
पोलीस अधिकाऱ्यांचे सायकल पेट्रोलिंग
By admin | Published: November 26, 2015 10:42 PM