इंदिरानगर : पोलीस ठाण्याच्या वतीने जॉगिंग ट्रॅकवर व परिसरातील रस्त्यांवर फेरफटका मारणाऱ्या नागरिकांविरुद्ध संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईची धडक मोहीम सुरू केल्याने रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणेसुद्धा मुश्किल झाले आहे. विनाकारण नागरिकांनी फिरू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे तरीही काही नागरिक फेरफटका मारायला फिरत आहेत. त्याची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांपूर्वी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पांडवलेणी येथे फेरफटका करण्यासाठी आलेल्या चार नागरिकांवर प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे एकूण चार हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली होती तरीही काही नागरिक जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारायला येत असल्याचे समजले. त्याची दखल घेत जॉगिंग ट्रॅकवर सकाळी व सायंकाळी बीट मार्शलांची गस्त वाढविण्यात आल्याने जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी दंडात्मक कारवाईच्या भीतीने न येणे पसंत केले. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर शुकशुकाट दिसून आला तसेच सकाळी व सायंकाळी गजानन महाराज मार्ग, कलानगर ते पाथर्डी गाव वडाळा पाथर्डी रस्ता, श्रीकृष्ण चौक ते राणेनगर चौफुली, पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा सह परिसरातील अंतर्गत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.फोटो आर वर २८जॉगिंग नावाने सेव्ह आहे.