नाशिक : एकीकडे सुमारे चारशे पोलीस कर्मचारी हेल्मेटसक्तीसाठी रस्त्यावर सामान्य नागरिकांना वाहतुकीचे धडे देत असताना दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाणारा वकीलवाडी परिसर मात्र वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाला होता. सोमवारी (दि. १३) वकीलवाडीत वाहतुकीची सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.गेल्या अनेक दिवसांपासून अशोकस्तंभ ते मेहेर सिग्नल रस्त्याचे स्मार्ट करण्याचे काम चालू असल्यामुळे वकीलवाडी भागाला वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात एकेरी वाहतूक असूनसुद्धा वाहतूक पोलीस मात्र हेतुपुरस्सर या भागाकडे दुर्लक्ष करतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनसुद्धा येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे रॉँगसाईडने जाणाऱ्यांना कोणताही अटकाव नाही. त्यातच वकीलवाडीत अतिक्रमणाची मोठी समस्या आहे.तसेच नाशिक महानगरपालिका मोकळ्या जागेतील वास्तू सील करण्यात धन्यता मानत असताना वकीलवाडीमधील अनधिकृत इमारती मात्र अतिक्र मण करून सर्रासपणे आपले व्यवसाय करीत आहेत. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्याकडे रहिवाशांनी तक्रार करूनसुद्धा नोटीस काढण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती. वाहनतळासाठी जागाच सोडलेली नसतानाही याठिकाणी व्यापारी संकुले उभी आहेत.तसेच या भागातील व्यावसायिक आपल्या दुकानाचे जाहिरात फलक तसेच दुकानापुढे वाहने लावू नये म्हणून अडथळा निर्माण करताना दिसत आहेत. महापालिकेचे अधिकारी- कर्मचारी याच भागातून ये-जा करीत असतात. नगरसेवकांनी तर वकीलवाडी आॅप्शनला टाकली असून, या भागातील वाहतूक समस्या कधी सुटणार, असा प्रश्न आहे. या भागाला कोणी वाली नसल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, यावर लवकरच कायमस्वरूपाचा तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे .अनेक आयुक्त आले गेले...माजी आयुक्त कृष्णकांत भोगे यांनी या भागातील वाहनतळ नसलेल्या मिळकती सील करण्यात येईल, असे जाहीर केले होते. परंतु त्यानंतर अनेक आयुक्त आले गेले, परंतु वकीलवाडीत अशाप्रकारे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही.
पोलीस कर्मचारी हेल्मेटसक्तीसाठी ; वकीलवाडीत ट्रॅफिक जॅम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:09 AM