नाशिक : बेकायदेशीरपणे चांदशी शिवारातील सेक नावाच्या हॉटेलमध्ये सर्रासपणे ह्यहुक्काह्ण ओढत हवेत धूर सोडला जात होता. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्याअधारे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने छापा मारत हॉटेल मालक, व्यवस्थापकासह हुक्का पिणारे २३ ग्राहक आणि त्यांच्या सेवेत असलेले तीन वेटर यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चांदशी, दरी, मातोरी या भागात सर्रासपणे विविध हॉटेलमधून हुक्का, अवैध मद्यविक्री केली जाते. याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे नागरिकांकडून थेट तक्रार आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी माहिती घेत गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या विशेष पथकाने चांदशी शिवारातील सेक हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास छापा टाकला. यावेळी येथील एका खोलीत सर्रासपणे मोठ्या संख्येने नागरिक हुक्का पिताना आढळून आले.
तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या तीन वेटरसह हॉटेल मालक शिवराज नितीन वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे (रा.पंचवटी) यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून हुक्का ओढण्याचे साहित्य तसेच तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईने बेकायदा हुक्का पार्लरचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.