कसबे सुकेणे येथील बसस्थानकावर असलेल्या एका हाॅटेलमध्ये धारदार शस्त्र ठेवल्याची गुप्त माहिती ओझर पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी सापळा रचून कसबे सुकेणे येथील हॉटेलवर धाड टाकली. यावेळी अनेक गुन्हे दाखल असलेल्या एकोणीस वर्षीय संशयित आरोपीस धारदार तलवारीसह ताब्यात घेतले.
कसबे सुकेणे येथील बस स्टँडजवळील चायनिज हॉटेलमध्ये गुंड प्रवृत्तीची व्यक्ती दहशत पसरविण्यासाठी व काही तरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असून त्यासाठी प्राणघातक शस्त्र लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अनुपम जाधव, नितीन करंडे, इम्रान खान, भास्कर पवार व अमोल सूर्यवंशी, जालिंदर चौघुले यांच्यासह सापळा रचून रात्री साडेसात वाजता मधु मिलन या चायनिज कार्नरजवळ पाळत ठेवली. त्याचवेळी तेथे एक व्यक्ती संशयितरित्या उभा असलेला दिसला. संशय बळावल्याने कसबे सुकेण्याच्या काही पंचांना घेऊन हॉटेलचा ताबा घेतला व विश्वासात घेऊन तपास केला असता हॉटेलच्या किचनमधून चारशे रुपये किमतीची तीन फूट लांबीची व सहा इंच पितळी मूठ असलेली अडीच इंच धारदार पाते असलेली तलवार सापडली. यावेळी पोलिसांनी सनी उर्फ चिक्या ज्ञानेश्वर गोसावी (१९, रा. कानिफनाथ चौक, कसबे सुकेणे) यास रंगेहाथ पकडले.
त्याच्यावर ओझर पोलीस ठाण्यास भारतीय हत्यार कायदा ४/२५ प्रमाणे बेकायदेशीर प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस अंमलदार अनुपम जाधव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून या आधीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
कोट...
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जमाव बंदी व हत्यार बंदीचे आदेश जारी केलेले असतानाही या आरोपीने या नियमांचे उल्लंघन करीत तलवारीसारखे भयानक हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
- अशोक रहाटे, पोलीस निरीक्षक