लासलगाव : पाचशे रूपयांच्या २९१ बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या महिला डॉक्टरसह पाच संशयित आरोपींना लासलगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि. १४) न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीश एस. बी. काळे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अन्य संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.पाचशे रुपयांच्या २९१ बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी बुधवारी (दि. १३) पर्दाफाश करत एका महिला डॉक्टरसह पाचजणांना अटक केली होती. त्यात मोहन बाबुराव पाटील व डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ (दोघे रा. बोराडे हॉस्पिटलजवळ) व विठ्ठल चंपालाल नाबरीया (रा. कृषीनगर, कोटमगाव रोड, लासलगाव, ता. निफाड) तसेच रवींद्र हिरामण राऊत (रा. स्मारक नगर पेठ, ता. पेठ, जि. नाशिक) व विनोद मोहन पटेल (रा. पंचवटी, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले होते.
या संशयितांकडून १ लाख ४५ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या. याशिवाय कारही जप्त करण्यात आली होती. या संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. दरम्यान, संशयित व्यक्तींचा शोध घेण्याकरिता लासलगावचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांच्यासह पोलीस पथक रवाना झाले आहे.