आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पाटील याला पालघर जिल्ह्यातून अटक करून त्याच्याकडून एक लाख ८९ हजार रुपये किमतीचे रेमडेसिविर ६३ इंजेक्शन जप्त केले होते, तर पाटील हा इंजेक्शन बनविण्याच्या कंपनीत हेल्पर म्हणून कामाला असल्याने त्याने इंजेक्शन चोरून तो एम.आर. म्हणून काम करणाऱ्या अभिषेक शेलार याच्या मध्यस्थीने रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करायचा. आठवडाभरापूर्वी आडगाव पोलिसांनी सुरुवातीला दोन नर्सला ताब्यात घेतले होते. त्यानंतर मोठी साखळी असल्याचे निष्पन्न होताच पोलीस पथकाने पालघर जिल्ह्यातील अन्य काही संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यात पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे असलेल्या कमला लाइफ सायन्सेस कंपनीत हेल्पर असणारा सिद्धेश पाटील हा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पाटील याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याचे पाटील याने पोलिसांना सांगितल्याने आडगाव पोलीस पथक संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहे.