नाशिक : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (दि.६) नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने गिरणारे गावात दंगल नियंत्रण पथकासह सशस्त्र रुट मार्च करण्यात आला. नवरात्रोत्सवात पंचक्रोशीत कोठेही अनुचित प्रकार घडू नये, सण, उत्सव शासनाच्या नियमानुसार शांततेत साजरे व्हावे आणि समाजकंटकांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने तालुका पोलिसांनी सशस्त्र संचलन करत शक्तीप्रदर्शन केले.
गिरणारे आउट पोस्ट हद्दीत चार अधिकारी, १२ अंमलदार, दंगल नियंत्रण पथकाचे १८ जवान, नऊ होमगार्ड असा फौजफाटा अचानकपणे गिरणारे गावातील वेशीवर येऊन धडकला. पोलिसांच्या वाहनांचा ताफा गावात दाखल होताच नेमके काय झाले? याविषयीची शंकेची पाल गावकऱ्यांच्या मनात चुकचुकली; मात्र काही वेळेतच पोलिसांचे सशस्त्र संचलन असल्याचे जाहीर करण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अपर अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी पाच वाजता भाजी मंडईपासून संचलनाला सुरुवात करण्यात आली. किराणा बाजार, सराफ बाजार, गिरणारे चौफुली, दुगाव चौफुलीपर्यंत पोलिसांच्या फौजफाट्याने पायी संचलन केले. संध्याकाळी साडेसहा वाजता संचलन संपले. दरम्यान, यानंतर आहिरराव यांनी नवरात्रोत्सव मंडळाच्या बैठका घेतल्या आणि शासनाच्या अटी, शर्तींचे कोणत्याही प्रकारे कोणीही उल्लंघन करणार नाही, याबाबत समजावून सांगितले. नियमांचा भंग झाल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मंडळांच्या अध्यक्षांना सीआरपीसी१४९च्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.