पंचवटी : जिल्ह्यातील पोलिसांनी एकत्र येत पोलीस दलासाठी स्थापन केलेल्या जिल्हा पोलीस क्रेडिट सहकारी सोसायटीकरिता ६९ वर्षांनंतर प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. रविवारी (दि.२०) निवडणूक प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यात ६३.३२ टक्के मतदान झाले. शहरात एक हजार ९१८ तर जिल्ह्यात १ हजार ५३ असे एकूण २९७१ पोलीस सभासदांनी मतदान केले. संपूर्ण जिल्ह्यात २० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक यांचे यापूर्वी सोसायटीवर पूर्णपणे नियंत्रण असायचे. आता पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आल्याने निवडून आलेले पोलीस कर्मचारी संचालक म्हणून सोसायटीवर विराजमान होणार आहेत. सोसायटी स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक प्रक्रिया घेतली गेली. सुमारे ५१०० सभासद असलेल्या या निवडणुकीसाठी प्रगती परिवर्तन व सहकार हे तीन पॅनल रिंगणात होते. यामध्ये सर्वसाधारण दहा, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जागांसाठी प्रत्येकी एक तर महिला राखीव गटासाठी दोन अशा १५ जागांसाठी मतदान घेण्यात आले.निवडणूक रिंगणात शहर वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय महिला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच पोलीस अकादमी या विभागात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचा उमेदवार म्हणून समावेश करण्यात आलेला होता. पोलीस कर्मचारी पोलीस क्रे डिट को-आॅप. सोसायटीच्या निमित्ताने पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने पोलीस दलाचे लक्ष लागले होते. सोमवारी (दि.२१) मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. रविवारी सकाळी आरपी विद्यालय झालेल्या मतदानासाठी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. केंद्राबाहेर तीनही पॅनलचे बूथ लागलेले होते. तर मतदानासाठी येणाºया प्रत्येक मतदाराला पोलीस हात जोडून आपल्यालाच मतदान करण्याची विनवणी करीत असल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना सौंदाणे यांनी कामकाज पाहिले....अन् पोलिसांनी जोडले पोलिसांना हातएरवी पोलीस म्हटले तर बंदोबस्तात व्यस्त असल्याचे चित्र डोळ्यापुढे येते. पोलीस क्रे डिट को-आॅप. सोसायटीच्या निमित्ताने पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या निवडणुकीमुळे पोलीस कर्मचारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणेच किंबहुना त्यालाही लाजवेल, अशा देहबोलीद्वारे पोलीस कर्मचारी मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होते. आर.पी. विद्यालयाच्या प्रांगणात सकाळपासून दिवसभर पोलीस उमेदवार येणाºया मतदारांना हात जोडून विनवणी करीत होते.
पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:39 AM