वणी : राजकीय व्यक्तींबरोबर फेसबुकवरून फोटो शेअर करून प्रभाव वाढविणाऱ्या तोतया राहुल आहेरचे फेसबुक अकाऊंट फ्रीज केले असून त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. खेडगाव येथील तक्रारदारांनी राहुल विरोधात तक्रारी केल्याची माहिती मिळाली आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नावाचे बनावट कागदपत्र वापरून ईनोव्हा कारवर विवक्षित लोकप्रतिनीधींचा लोगो लावल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या वणी पोलीस कोठडीत आहे. फेसबुक अकाऊंटवर विविध राजकीय व्यक्तींबरोबरचे छायाचित्र सोशल मीडियावर फिरत असताना राहुल याचे फेसबुक अकाऊंट फ्रीज करण्यात आले आहे. राहुलकडून फसवणूक झालेल्या खेडगाव येथील व्यक्तींनी पोलिसांत धाव घेऊन आपबिती कथन केल्याची माहीती प्राप्त झाली आहे. बलदंड शरीर, जीमची आवड, सिनेअभिनेत्यासारखे व्यक्तिमत्त्व व संवादाची अनोखी शैली असा असलेल्या राहुलचे अनेक प्रताप समोर येण्याचे बोलले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना या प्रकरणामुळे चांगलाच दणका बसलेला आहे. लोकप्रतिनिधीनाही समोरील व्यक्ती कोण आहे, काय आहे, पार्श्वभूमी काय आहे याची माहिती नसते. राहुलसारखा एखादा यंत्रणेच्या जाळ्यात अडकतो व तेव्हा वास्तव बाहेर येते . लोकप्रतिनिधींच्या नावाचा, लेटरपॅडचा गैरवापर करणारे कोणत्या थराला जाऊ शकतात हे राहुलच्या रुपाने पुढे आले आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी स्वप्नील राजपूत करीत आहेत.
-----------------
दुबईवारी कशासाठी?
राहुल याने दुबईवारी केल्याचे तपासात पुढे आले आहे. राहुल दुबईला का? व कोणत्या कामासाठी गेला होता याचे उत्तर शोधताना राहुलकडे दुबईवारी करण्यासाठी व तेथे वास्तव्य करण्यासाठी पैसा कोठून उपलब्ध झाला हा तपासाचा भाग असला तरी सखोल चौकशीसाठी राहुलचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला आहे.