नाशिक- राज्यात राजकिय भुकंप होऊन भाजप तसेच राष्टÑवादीतील फुटीर गट सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्यानंतर त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटू नये यासाठी नाशिक शहरातील सर्वच पक्ष कार्यालयांच्या बाहेर कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याच प्रमाणे पोलीसांची गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने दुपारी वसंत स्मृती कार्यालयासमोर जल्लोष करण्यात येणार आहे.
राज्यात शिवसेना- राष्टÑवादी आणि कॉँग्रेस अशी राजकिय समिकरणे जुळवली जात असतानाच मध्यरात्री झालेल्या घडामोडीनंतर भाजप आणि राष्टÑवादीचा एक गट एकत्र आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यामुळे कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेला धक्का बसला असून त्यामुळेच त्याचे पडसाद उमटू शकतील अशी शक्यता गृहीत धरून नाशिक शहरात राजकिय पक्ष कार्यालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
एन. डी. पटेल रोडवरील भाजपचे वसंत स्मृती कार्यालय, मुंबई नाका येथील राष्टÑवादी भवन एम. जी. रोडवरील कॉँग्रेस भवन आणि शालीमार येथील शिवसेना कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा राज्यपालांकडे दिल्यांनतर नाशिकमध्ये भाजप कार्यालयाबाहेर अज्ञातांनी फटाके वाजवले होते. ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच फोडल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर याकार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आताही राजकिय वादाची शक्यता गृहीत धरून भाजप आणि अन्य कार्यालयांच्या बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.