नाशिक : महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील सर्वोत्तम पोलिस दल आहे. पोलिस दलाचा इतिहास गौरवशाली आहे एखाद्या पोलिसाकडून चुकीचे कृत्य घडले तर पोलिस दलाला टीकेला सामोरे जावे लागते. पोलिसांनी अशावेळी आपली शपथ निभवण्यासाठी आपले पोलिस दल समाजभिमुख कसे होईल, यासाठी योगदान द्यावे. शासक नव्हे तर जनसेवक म्हणून पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये सुरू असलेल्या ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी शनिवारी (दि.१०) प्रमुख अतिथी म्हणून फडणवीस उपस्थित होते. यावेळी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरिष महाजन, पालकमंत्री दादा भुसे हेदेखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, क्रीडा स्पर्धा ही अत्यंत उत्तम व यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेत राज्यातील पोलिस दलाचे विविध खेळाडूंनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या क्रीडाकौशल्याने मैदान गाजविले. अशा स्पर्धांमधून देशाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मिळतात. महाराष्ट्र पोलिस दलात असे अनेक पोलिस खेळाडू आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. ज्या खेळाडूंनी विजयश्री मिळविला त्यांनी पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविण्यासाठी जोरदार तयारी करावी, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.
राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपिठावर विशेष पोलिस महानिरिक्षक (प्रशासन) डॉ. आरती सिंग, अकादमीचे संचालक राजेश कुमार पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक अपर पोलिस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखील गुप्ता यांनी केले. आभार नाशिकचे पोलिस महानिरिक्षक दत्ता कराळे यांनी मानले.