नाशिकरोड : वाढत्या गुन्हेगारी व अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची विशेष गस्त मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे टवाळखोर, गुन्हेगार, समाजकंटकांचे धाबे दणाणले असून या मोहिमेंतर्गत टवाळखोर, सराईत गुन्हेगार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, यांच्यावर कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करून संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच मध्यरात्रीच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवून संशयितांच्या घरांची झाडाझडती घेणे, रेकॉर्डवरील आरोपींची माहिती अद्यावत करणे, त्यांची चौकशी करणे, सराईत गुन्हेगार, तडिपारांचा शोध घेऊन कारवाई करणे हे मोहिमेचे उद्देश आहेत. रात्री दहानंतर रोड, पान टपऱ्या, अंडा रोल व आइस्क्रीमच्या गाड्या बंद करण्यात येणार आहे. ही मोहीम पुढील महिनाभर नियमित राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांची उपनगरला रात्रीची विशेष गस्त मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2022 1:32 AM