दिंडोरी : राज्यातील पोलीसपाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीसपाटील संघटनेच्या हजारो पोलीसपाटलांनी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले.नाशिक जिल्ह्याती, पोलीसपाटलांनीही यात सहभाग घेतला.गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून संघटनेला यावेळी आश्वासन दिले. पुढील अधिवेशनात आपणास अशा प्रकारचे आंदोलन करावे लागणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीसपाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदेपाटील, भृंगराज परशुरामकर, श्रीकृष्ण साळुंके, कमलाकर मांगले, बळवंत काळे आदी राज्य पदाधिकारी, नाशिक जिल्हा अध्यक्ष चिंतामण मोरेपाटील, दिंडोरी तालुका अध्यक्ष सोमनाथ मुळाणे- पाटील, राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरेपाटील यांनी २००३ ला नागपूर अधिवेशनासाठी जाताना मृत्यू झालेल्या आठ पोलीसपाटलांचा मुद्दा सर्वांसमोर अतिशय जोरदारपणे मांडला. त्या सर्व पोलीसपाटलांच्या वारसांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या सर्व मागण्यांसोबत ही मागणी मान्य झाली पाहिजे नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा मोरे यांनी दिला. त्यास सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच पोलीसपाटलांच्या सर्व मागण्यांसंदर्भात आपण कायमच पाठिंबा दिला आहे. सर्व मागण्यांसंदर्भात सभागृहात कायम पाठपुरावा करू, असे आश्वासन दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिले आहे.याप्रसंगी नाशिक जिल्हा पोलीसपाटील संघटनेचे पदाधिकारी, दिंडोरी तालुका अध्यक्ष सोमनाथ मुळाणेपाटील, उपाध्यक्ष शिवाजी खराटे, वामन पाटील, अशोक सांगळे, रोशन परदेशी, नीलेश बोडके, सुरेश गाडे, पंढरीपाटील गडकरी, राजेंद्र महाले, किरण निरघुडे, सुनीता बोडके, स्वाती निमसे, मंदा धात्रक, मीना पोटे, सीमा लोखंडे, चंदू जाधव, हिरामण बोंबले आदी पोलीसपाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.