पांडाणे : साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धे पीठ असलेल्या श्री सप्तशृंग मातेचा शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कळवण पोलीस विभागाचे उपअधीक्षक देवीदास पाटील यांनी गडावर सुरक्षिततेची पाहणी केली व बंदोबस्ताबाबत सूचना दिल्या. शारदीय नवरात्रोत्सव काळात धुळे, जळगाव, नगर, नाशिक, नंदुरबार, मुंबई व गुजरात, सुरत, अहमदाबाद, बडोदा, नवसारी या भागातील भाविक मोठ्या संख्येने सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येत असतात. यात्रा काळात एक अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस उप निरीक्षक, पुरुष पोलीस कर्मचारी, १५९ महिला पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे तीन पोलीस अधिकारी व ४७ वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त आहे. नवरात्रोत्सव काळात सर्व खबरदारीच्या उपाययोजना अवलंबिण्यात येत असून, भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे व सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनखासगी वाहनांना प्रवेशबंदी केली असून, नांदुरी ते सप्तशृंगगड अशा बसने भाविकांच्या सेवेसाठी बसस्थानक उभारण्यात आले आहे. भाविकांनी कुठल्याही बेवारस वस्तूला हात लावू नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांततेत दर्शन घ्यावे, गर्दीच्या काळात काही बेवारस वस्तू दिसल्यास पोलिसांना कळविणे व चेंगराचेंगरी होणार नाही याची भाविकांनी दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांनी केले आहे.
पोलीस उपअधीक्षकांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा
By admin | Published: October 01, 2016 12:28 AM