दरम्यान, शहर व परिसरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर रात्री तसेच दुपारच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवून विनाहेल्मेट आलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल उपलब्ध करून दिले जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. अशा तक्रारी आयुक्तालयाला सातत्याने प्राप्त होत असून, या तक्रारींची दखल घेत आता पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकांकडून अचानकपणे पेट्रोल पंपांना भेटी देत पाहणी केली जाणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. या पाहणीत ज्या पेट्रोल पंपावर अशाप्रकारचे चित्र दिसेल, त्या पंपाच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस आयुक्तालयाकडून बजावली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
--इन्फो--
५०२ दुचाकीस्वारांचे समुपदेशन
आठवडाभरात ४६६ पुरुष, तर ३६ महिला दुचाकीस्वारांसह एकूण ५०२ विनाहेल्मेट वाहनचालकांचे समुपदेशन पोलिसांकडून पूर्ण करण्यात आल्याचा दावा आयुक्तालयाकडून करण्यात आला आहे. ही मोहीम दररोज सुरू असून, शहरात या अभियानाचे फलित दिसत असून, सुमारे ८० टक्के इतके वाहनचालक दुचाकी चालविताना हेल्मेटच्या वापरास प्राधान्य देताना दिसून येत आहे, असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले.