नाशिक : खून, मारहाण, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, गावठी पिस्तूल बाळगणे, दहशत माजविणे आदींसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व काही दिवसांपूर्वीच खंडणी प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे ऊर्फ तुक्या याने पोलिसात तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात सरकारवाडा पोलिसांसमोर घडली़पोलीस गाडीतून उतरून तक्रारदाराच्या अंगावर धावून जात धमकी दिल्याचा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारात व तोही सरकारवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसमोर घडल्याने गुन्हेगारांची मजल किती वाढली हे दिसून आले़ विशेष म्हणजे हा सर्व प्रकार होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी रविवार कारंजा भागात हातगाडीचालकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणी सराईत गुन्हेगार चोथवेवर सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्यास गुरुवारी (दि.२०) अटक करून पंचवटी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. फरार कालावधीत चोथवे याने क्रांतिनगरमधील एका दाबेली विक्रेत्याकडे दोन लाखांची खंडणी मागून धमकी दिली होती. यामुळे संबंधित दाबेली विक्रेत्याने गुरुवारी (दि.२०) पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेऊन तक्रार केल्यानंतर त्यास आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले होते.संबंधित दाबेलीचालकाने चोथवेविरोधात तक्रार करण्यासाठी शुक्रवारी (दि.२१) पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी सरकारवाडा पोलीस चोथवेला नेण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात आले असता त्यांनी कोठडीतून चोथवेला बाहेर काढून पोलीस वाहनात बसविले़ यावेळी चोथवेची दाबेली विक्री करणाºया तक्रारदारावर नजर पडताच तुरुंगातून सुटल्यावर तुला गोळ्या घालतो, अशी धमकी देत गाडीतून उतरून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला़सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवेवर चार वर्षांपूर्वी उदय कॉलनीत राहणाºया समीर हांडे या युवकाच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे़ या निर्णयाविरोधात चोथवेने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही अटी-शर्तींवर त्यास जामीन मंजूर करण्यात आला असून, सद्यस्थितीत तो जामिनावर आहे. विशेष म्हणजे त्याने उच्च न्यायालयाच्या अटी-शर्तीचा भंग केला असून, तसा अहवाल पंचवटी पोलीस न्यायालयात सादर करणार असून, जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत़ - मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी
पोलिसांसमोरच सराईत गुन्हेगाराची तक्रारदारास धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:55 AM