सिडको : गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून पोलीस कडक वागतो. परंतु सामान्य माणसांसाठी पोलीस हा संवदेनशील माणूस असून, तो त्यांचा मित्र असतो, असे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्याेदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मधुकर कड यांनी ‘पोलिसामधील माणूस’ या विषयावर गुंफले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे उपस्थित होते.यावेळी कड यांनी सांगितले की, गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्हाला कडक वागावे लागते. परंतु सामान्य माणसांसाठी आम्ही मित्र म्हणून मदत करतो. रोज पोलीस स्टेशनमध्ये असंख्य नागरिक तक्र ारी घेऊन येतात. आपापसातील भांडणे आम्ही सामोपचाराने सोडवून देतो. पोलीस स्टेशनमध्ये जेवढे गुन्हे दाखल होतात त्याहीपेक्षा आम्ही भांडणे समजुतीने सोडवून देतो. परंतु वर्तमानपत्रांमध्ये वर्षभरात किती गुन्हे घडले हे प्रसिद्ध होते. पण एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये किती गुन्हे पोलिसांनी सकारात्मकरीत्या सोडविले हे येत नाही. त्यामुळे काहीवेळा पोलिसांना त्रास होतो. तरीही कर्तव्याच्या भावनेतून पोलीस अधिकारी व कर्मचारी कायमच नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहतात असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोनार यांनी केले. जयराम गवळी यांनी आभार मानले.कायमच कर्तव्य दक्षअपघाताच्या ठिकाणी लोक फोटो काढण्यास प्राधान्य देतात, परंतु अपघात झाल्यानंतर मदतीसाठी सर्वप्रथम पोलीसच असतो. दिवाळी, दसरा आणि ईद या सणांची सुटी न घेता पोलीस काम करीत असतात. परंतु त्यालाही कुटुंब असते, तोही माणूस आहे. त्यांनाही सुख- दु:ख, लग्न, मुलांचे शिक्षण असतात. त्याच्यावर इतरही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात याचा कोणी विचार करीत नाही. तरीही तो जनतेसाठी नेहमीच सेवा देण्यास तयार असतो, आम्हाला कायमच कर्तव्य दक्ष राहावे लागते असेही कड यांनी यावेळी सांगितले.
गुन्हेगारांवर वचकसाठी पोलीस कडक वागतो : मधुकर कड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:50 AM