शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १४ पोलीस ठाणे आहेत. तसेच गुन्हे शाखांचे युनिट १ व २ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखा असे तीन युनिट कार्यरत आहेत. या बदलीप्रक्रियेत गुन्हे शाखा व वाहतूक शाखेकरिता आहे तेवढेच किंवा गरजेनुसार कमी अधिक मनुष्यबळ पुरविले आहे. वर्षानुवर्षांपासून आयुक्तालयातील बहुतांश पोलीस अंमलदार बदलीनंतरही आहे, त्याच ठिकाणी सेवा देत वेतन मात्र नव्या बदलीच्या ठिकाणाचे घेत होते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या जणू कागदोपत्रीच राहत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगू लागली होती. तसेच कामाचा वेगवेगळा अनुभवदेखील सर्वांना घेता येत नव्हता. एकाच ठिकाणी कायम राहत वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी राखत ‘संलग्न’प्रक्रिया आयुक्तालयाच्या हद्दीत ‘दम’दारपणे राबविली जात होती; मात्र यावर्षी पाण्डेय यांनी याप्रक्रियेला पूर्णत: छेद दिला आहे.
मुख्यालयातील कर्मचाऱ्यांवर नवीन जबाबदारी सोपवत त्यांचा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केला जात आहे. यंदा पाण्डेय यांनी बदली करताना कर्मचाऱ्यांना संलग्न सेवा न बजावण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी बदली झाली आहे तेथे हजर होत सेवा बजावणे संबंधित पोलीस अंमलदाराला बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी राखून एकाच ठिकाणी सेवा देत ‘मेवा’ खाणाऱ्यांची पुरती ‘कोंडी’ झाली आहे. त्यामुळे अशा अंमलदारांना बदली झालेल्या नव्याठिकाणी हजर राहण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांच्यात काहीसा नाराजीचा सूर जरी असला तरी अनेकांनी मात्र या निर्णयाविषयी समाधानही व्यक्त केले आहे.
--इन्फो--
टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही
पोलीस आयुक्तालयाकडून ज्या अंमलदाराची जेथे बदली केली गेली आहे, तेथे त्यांनी हजर होऊन सेवा देणे बंधनकारक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले. याबाबत संबंधितांकडून कुठल्याही प्रकारची टाळाटाळ केली गेली, रत ती खपवून घेतली जाणार नसल्याचे पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे बदलीनंतरची संलग्न सेवा प्रक्रिया आता जवळपास संपुष्टात आली आहे.