टोल नाक्यावर अनधिकृत वसुली
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील सीमारेषांवर असलेल्या काही टोलनाक्यांजवळ वाहनधारकांकडून तृतीयपंथीयांकडून राजरोस वसुली केली जात असल्याचा प्रकार सुरू झाला आहे. अनेकदा वाहनधारकांना बळजबरीने पैसे देण्यास भाग पाडले जाते. अगोदरच टोलची रांग त्यातच टोलची रक्कम भरताना त्रासलेल्या वाहनधारकांना तृतीयपंथीयांचा त्रास सहन करावा लागत आहे.
नाशिककरांकडून सिटीलिंकला प्रतिसाद
नाशिक: महापालिकेच्या प्रवासी बससेवेला नाशिककरांचा प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आरामदायी प्रवासासाठी नाशिककर महापालिकेच्या बसचा अनुभव घेत आहेत. नव्या बसमध्ये बसून प्रवास करण्याचा नुसता अनुभव घेण्यासाठी नाशिककर प्रवास करीत असल्याचे दिसते. प्रवाशांकडून बससेवेविषयी अनुकूल प्रतिक्रिया येत आहेत.
ऑनलाईन शिक्षणात रेंजचा अडथळा
नाशिक: ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले जात असले तरी विद्यार्थ्यांना मोबाईलवरील रेंजचा अडथळा येत आहे. इमारतीमध्ये राहाणाऱ्या अनेकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना मोबाईल पोर्टेबिलिटी करून घ्यावी लागली असून मोबाईल डाटावर देखील खर्च करावा लागत आहे. यामुळे शाळा आणि ऑनलाईन वर्गात अडथळा निर्माण होत आहे.
पाटील महाविद्यालयात बांबू प्रशिक्षण
नाशिक: मविप्र संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील या कृषी महाविद्यालयात बांबू प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. जिल्ह्याला बांबू क्लस्टरची मान्यता देण्यात आली असल्यामुळे बांबू उत्पादनाच्या बाबतीत प्रयत्न केले जात आहेत. मविप्रतर्फे शासनाला याबाबतचा प्रकल्प सादर करण्यात आला होता. त्यानुसार उत्पादन, वस्तू, साहित्यनिर्मिती, बाजारपेठ याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
पाणी कपातीबाबत आज पालिकेत बैठक
नााशिक- जिल्ह्यातील पावसाची स्थिती आणि धरणातील एकूणच पाणीसाठा लक्षात घेता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पालिकेला पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार पालिकेत सोमवारी (दि.१२) बैठक बोलविली असून त्यामध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे. महापौर याबाबत सर्व गटनेत्यांशी चर्चा करणार आहेत.