राज्य शासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी आदेश राज्यभरात लागू केला आहे. या आदेशाचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. आदेशाचे उल्लंघन करीत नियम पायदळी तुडविण्याचा जर कोणी प्रयत्न करताना आढळून आल्यास त्याच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पाण्डेय यांनी दिला आहे. जर नियमांचे हेतूपुरस्सर कोणी उल्लंघन करीत असेल तर मात्र पोलिसांकडून दंडुका उगारला जाणार आहे, हेदेखीत निश्चित आहे. निर्बंध आणि त्यांची अंमलबजावणी हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. कोरोनापासून नागरिकांचा जीव वाचावा, हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना नाशिक शहर पोलिसांकडून वागणूक दिली जाणार नसल्याचेही पाण्डेय म्हणाले. पोलीस आयुक्तालयाची भूमिका त्यांनी स्पष्ट करीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आमचे पोलीस दल प्रयत्नशील असून नाशिककरांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. विनाकारण जमाव जमविला आणि सार्वजनिक मालमत्तेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला तर मात्र पोलिसांकडून संबंधितांची गय केली जाणार नाही, असेही पाण्डेय यांनी सांगितले.
---इन्फो--
राज्य राखीव दलालाही पाचारण
नाशिक शहर पोलीस प्रशासनाच्या मदतीला राज्य राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले आहे. सुमारे १६०पेक्षा अधिक राज्य राखीव दलाचे जवान नाशिक आयुक्तालयात दाखल झाले आहेत. या जवानांना विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्तावर नियुक्त करण्यात आले आहे. तसेच गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) काही जवानांना मदतीला घेण्यात आले आहे.