मतदार यादीतील नावांचा घोळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी शिवसेनेने नुकतेच पोलीस आयुक्त पाण्डेय यांना निवेदनदेखील दिले आहे. नावांच्या घोळामुळेच भाजपचे आमदार निवडून आल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. या निवेदनावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना पाण्डेय म्हणाले, निवडणुकीच्या मतदार याद्यांशी संबंधित सर्व कामकाज हे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत चालते. त्यामुळे याबाबत आम्हाला थेट चौकशी करण्याचा अधिकार नाही; मात्र आपल्यासमोर आलेले पुरावे योग्य आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. त्यात तथ्य आढळून आल्यास पोलिसांकडे त्याबाबत तक्रार करावी. पोलीस गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करतील, असे ते म्हणाले. पोलिसांकडून याबाबतचे पत्र पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, मतदार यादी सातत्याने अपडेट करण्यात येते. यासाठी निवडणूक विभाग नेहमी कार्यरत असतो. हरकती, सूचना मागविल्या जातात. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या पत्रावर आणि शिवसेनेच्या आरोपांवर जिल्हाधिकारी मांढरे काय कार्यवाही करतात, याकडे आता शहरातील सर्वच राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.
मतदार यादीतील दुबार नावांची पोलीस घेणार दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:19 AM